३२ वर्षांनंतर दहावीचे वर्गमित्र पुन्हा एकत्र

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी): सिल्लोड, माहिती तंत्रज्ञान आणि सामाजिक माध्यमांच्या प्रभावी वापरामुळे सिल्लोड येथील न्यू हायस्कूलच्या १९९३ ९४ च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचे ३२ वर्षांनंतर स्नेहमिलन मोठ्या उत्साहात पार पडले.

शिक्षण, नोकरी, शेती आणि व्यवसायाच्या विविध वाटांवर विखुरलेले मित्र मैत्रिणी पुन्हा एकत्र येताच शालेय जीवनाच्या आठवणी ताज्या झाल्या. व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून संपर्क साधत माजी विद्यार्थ्यांनी स्नेहमिलनाचे नियोजन या केले. सकाळी न्यू हायस्कूलच्या प्रांगणात सर्व मित्रांची जमवाजमव झाली. महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. शाळेची घंटा वाजताच ३२ वर्षांनंतर दहावीची शाळा पुन्हा भरल्याचा अनुभव सर्वांनी घेतला.

माजी शिक्षकवृंद एस. एम. सांगोले, एम. पी. पवार, एम. एल. गोरे, व्ही. डी. शिंदे यांच्या आगमनाने वातावरण अधिकच भावनिक झाले. कार्यक्रमात माजी शिक्षकांनी हजेरी घेतली. प्रत्येक विद्यार्थ्याने आपला सध्याचा व्यवसाय, कुटुंबाची माहिती देत परिचय करून दिला.
 त्यानंतर नाश्त्यानंतर भव्य सभागृहात दुसरे सत्र पार पडले. यावेळी माजी शिक्षक, शिक्षिका व कर्मचारी यांचा फेटा बांधून व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. शालेय आठवणींना उजाळा देताना गाणी, कविता, नृत्य आणि मनोगत सादर करण्यात आले. अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. छायाचित्रणातून हे क्षण कायमस्वरूपी जतन करण्यात आले. स्नेहभोजनानंतर दिवसाभराच्या आनंददायी आठवणींसह स्नेहमिलन कार्यक्रम उत्साहात झाला.